बरेली : केशर साखर कारखाना प्रशासनाने बहेडी सीएचसीमध्ये ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रस्तावाला सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे बहेडीमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांना मदत होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपतींना ऑक्सिजन प्लांटसाठी आवाहन केले होते. तर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी साखर कारखान्याच्या मालकांकडून ऑक्सिजन प्लांटसाठी प्रस्ताव मागवले होते.
केशर साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद मिश्र यांनी बहेडी सीएचसीमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. या सीएचसीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे. येथे ३० बेडसाठी ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाऊ शकतो. त्याला शासनाने मंजूरी दिली आहे. जर्मनी अथवा तैवानमधून ऑक्सिजन प्लांटसाठी उपकरणे आणली जातील. त्याची किंमत ४० ते ५० लाखांच्या आसपास आहे.
हा प्लांट तीन ते चार आठवड्यात सुरू होईल. केसर कारखान्याचे अध्यक्ष शरद मिश्र यांनी सांगितले की, कमी कालावधील प्लांट सुरू करणे कठीण काम आहे. मात्र, अशा संकटाच्या समयी समाजसेवेला आम्ही प्राधान्य दिले आहे. शेतकरी आणि लोकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
दरम्यान तालुक्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने आमदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून सीएचसीचे रुपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याची मागणी केली आहे. जर केसर कारखान्यातर्फे उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटसाठी निधी कमी पडला तर तो आमदार निधीतून दिला जाईल असे गंगवार यांनी सांगितले.