बिजनौर: कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा साखर कारखान्यांची मदत घेत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर तयार केले होते. जिल्ह्यातील कारखान्यांनी तयार केलेले सॅनिटायझर देशभरात पाठविण्यात आले होते. आता प्रशासनाने कारखान्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास सांगितले आहे.
जे साखर कारखाने इथेनॉल उत्पादन करतात, त्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू होऊ शकतो. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी गेल्या वर्षीपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नव्हती. तेव्हा मास्क, सॅनिटायझर आणि साबण हेच या लढाईतील उपाय होते. जिल्ह्यातील धामपूर, अफजलगढ़, स्योहारा या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा सॅनिटायझर तयार केले. सार्वजनिक हीत लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारण्यातही आले. आता कोरोना संक्रमित व्यक्तींना ऑक्सिजनची सर्वाधिक गरज भासत आहे. मात्र, त्याचा पुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील काही उद्योजकांनीही अर्ज केले आहेत.
आता प्रशासनाने साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, अफजलगढ़, स्योहारा, बरकतपूर आणि धामपूर कारखान्यात इथेनॉल उत्पादन होते. तेथे लगेच ऑक्सिजन प्लांट सुरू होऊ शकतो. कारखान्यांकडे तांत्रिक व इतर स्टाफ आहे. त्यामुळे हे काम गतीने होऊ शकते. ऑक्सिजन उत्पादन सुरू झाल्यास टंचाई दूर होऊ शकते. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी जिल्हा प्रशासन आणि कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यास दुजोरा दिला.
दरम्यान, साखर कारखान्यांनी सॅनिटायझर बनविले होते. तर सध्या सॅनिटायझरची बाजारपेठ मंदावली आहे. संक्रमण गतीने वाढूनही नागरिकांकडून सॅनिटायझरचा वापर फारसा होत नसल्याचे दिसते. साखर कारखाने आता गेल्यावर्षीच्या शिल्लक सॅनिटायझरने सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन करीत आहेत.