पुणे : पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील संशोधकांनी चाबूक काणीस प्रतिरोध करू शकणारे दोन ‘जर्मप्लाझम’ (जननद्रव्य) शोधून काढले आहेत. त्यामुळे भविष्यातील उत्क्रांत होणारे वाण चाबूक काणी प्रतिरोधक असणार आहेत. राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरोनेही मान्यता देत जर्मप्लाझमची नोंद केली आहे. चाबूक काणी या बुरशीजन्य रोगामुळे बाधीत उसाच्या शेंड्यातून काळ्या चाबकासारखा पट्टा बाहेर पडतो. प्रचलित वाणांमध्ये २९ ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटते. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय अनेक वाणांना चाबूक काणी रोगाचा मोठा फटका बसला होता. आता या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यापूर्वी २०१६ मध्येही कोएम ७६०१ व एमएस ७६०४ असे जननद्रव्याचे स्त्रोत नोंदविले होते. आता विद्यापीठांतर्गत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या ऊसरोग शास्त्र विभागाने कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील आणि संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाबूक काणीस प्रतिरोध करणारी कोएम ११०८६ व कोएम १३०८३ यामधील दोन जननद्रव्ये शोधली आहेत. जर्मप्लाझम संशोधनाबाबत ऊस रोग शास्त्रज्ञ सूरज नलावडे म्हणाले की,‘‘सध्याच्या संशोधनातून मिळालेल्या चाबूक काणी विरूध्दच्या प्रतिकारक्षम स्त्रोतांचा वापर सध्या वाण उत्क्रांतीसाठी सुरू असलेल्या प्रजनन कार्यक्रमात करता येईल.’’ तर ऊस विशेषज्ज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी सांगितले की, सध्या देशभरातील संशोधन केंद्रांमध्ये सुरू असलेल्या संकरीकरणात या जर्मप्लाझम वापरून अधिक उत्पादन, उतारा देणाऱ्या आणि अधिक रोगप्रतिकारक वाणांची निर्मिती करता येणार आहे.