मुंबई : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर या कारखान्यास २९६ कोटी रुपयांची थकहमी मंजूर करण्यात आली आहे. तर करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखाना, भिलारवाडी या बागल यांच्या कारखान्यास १४० कोटी रुपये थकहमी मंजूर करण्यात आली आहे. या दोन कारखान्यांना एकूण ४३६ कोटी रुपयांची एनसीडीसीची थकहमी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या शिरूर येथील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला सतत प्रस्ताव देऊनही थकहमी देण्यात आलेली नाही.
दोन वर्षांपूर्वी विखे पाटील यांच्या कारखान्यास तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे थकहमी नाकारण्यात आली होती. त्यामुळे हा कारखाना अडचणीत होता. मात्र, आता थकहमी मंजूर करण्यात आली आहे. तर विधानसभा निवडणुकीआधी बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या कारखान्यांना कर्जाची परतफेड सहा वर्षांत करावी लागणार आहे. दरम्यान, सरकारने अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याला १७ कोटी ९३ लाख शासकीय भागभांडवल मंजूर केले आहे.