इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी महसुलात वाढीसाठी आणि देशातील गरीबांना मदत करण्यासाठी मोठ्या उद्योगांवर १० टक्के ‘सुपर टॅक्स’ लागू करण्याची घोषणा केली आहे. या बड्या उद्योगांमध्ये सीमेंट, स्टील, साखर, तेल, गॅस, खते, एलएनजी टर्मिनल, कापड, बँकिंग, ऑटोमोबाइल आणि सिगरेट यांचा समावेश आहे.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या एका भाषणात शरीफ यांनी सांगितले की, सरकारने देशाला गंभीर आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी काही धाडसी निर्णय घेतले आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेनंतर काही मिनिटातच पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज (PSX) मध्ये शेअर बाजार २००० अंकांनी घसरला. पाकिस्तानला आगामी १२ महिन्यांत कर्ज चुकविण्यासाठी आणि आयातीसाठी किमान ४१ अब्ज डॉलरची गरज आहे. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा १० अब्ज डॉलरपेक्षाही कमी झाला आहे. हा चलन साठा दोन महिन्यापेक्षाही कमी कालावधीच्या आयातीमध्येच खर्च होऊ शकतो.