हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
लाहोर (पाकिस्तान) : बँकेकडे गहाण ठेवलेला साखरेचा साठा चोरी केल्याप्रकरणी काश्मीर शुगर मिल्सच्या मालकांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश लाहोर कोर्टाने दिले आहेत. विशेष म्हणजे काश्मीर शुगर मिल्स ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नातेवाईकांच्या मालकीची आहे. साखर कारखान्याने एकूण तीन लाख ४१ हजार ८४० साखर पोत्यांचा साठा बँक ऑफ खैबर आणि अलफलाह बँकेकडे गहाण ठेवला होता. पण, त्यातील साखर पोती चोरीला गेल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.
मुहम्मद अहमद आणि खलिल अंजुम यांनी काश्मीर शुगर मिलच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यात जावेद शफी, शाहीद शफी, खालिदा परवेझ, झाहित शफी आणि तारीक शफी यांच्या विरोधात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. कारखान्याने एक लाख २४ हजार ४४० साखर पोती बँक ऑफ खैबरकडे गहाण ठेवल्याचा दावा याचिकाकर्ते मुहम्मद अहमद यांनी केला होता. तर खलिल अंजुम यांनी २ लाख १७ हजार ४०० साखर पोती अल फलाह बँकेकडे गहाण ठेवल्याचा दावा याचिकेत केला आहे. गेल्या २७ आणि २८ मार्च रोजी गोदामातील सुपरवायझरनी साखरेची पोती वाहनांमध्ये भरण्यात आल्याची माहिती दिली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोदामाला भेट दिली असता कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना गोदामात जाण्यापासून रोखल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
सुनावणी दरम्यान कारखान्याच्या वकिलांनी कायद्यानुसार कारखाना मालकांविरुद्ध गुन्हेगारी खटला चालवता येणार नाही, अशी बाजू मांडली. पण, खंडपीठाने दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर प्राथमिक स्थितीत हा चोरीचा प्रकार असल्याचे दिसते. त्यामुळे कारखाना मालकांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे आदेश दिले.