लाहोर : पाकिस्तान सरकारने गुरुवारी बॉयलर सुरू न करणाऱ्या १७ कारखान्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर कारखानदारांमध्ये ऊस गळीत हंगामाच्या प्रारंभाबाबत द्विधा स्थिती आहे. शरीफ कुटुंबीयांच्या मालकीच्या रमजान शुगर मिल्सने काही दिवसांपूर्वी गळीतास सुरुवात केली. तर जहांगीर खान तरीन यांच्या युनिटनी बुधवारी आपले बॉयलर सुरू केले. जहांगीर तरीन यांचा मुलगा अली खान तरीन यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाल्याचे ट्वीट केले आहे.
त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले की, पंजाब सरकारच्या निर्देशानुसार आम्ही उद्यापासून कारखाने सुरू करीत आहोत. ऊसाचा किमान समर्थन दर २२५ रुपयांवरून वाढवून ३०० रुपये करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आम्ही खूश आहोत. उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ महत्त्वाची आहे. दरम्यान, मुख्य सचिव अब्दुल्ला खान सुंबल यांनी १७ कारखान्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारखान्यांनी अद्याप आपले बॉयलर अग्नीप्रदीपन केलेला नाही. खान यांनी २५ नोव्हेंबरपर्यंत आपली युनिट चालू करण्याच्या अधिकृत आदेशांचे पालन न करणाऱ्या कारखानदारांविरोधात कारवाईचे निर्देश ऊस आयुक्त हुसैन हैदर अली शाह यांना दिले आहेत.