पाकिस्तानमध्ये सध्या भयानक पुराचे संकट ओढवले आहे. सतत सुरू असलेल्या पावसाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. आतापर्यंत १२०० जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ४०० मुलांचा समावेश आहे. सिंधू नदीचा जलस्तर सतत वाढत असल्याने पूरस्थिती बिकट बनली आहे. या विनाशकारी पुरामुळे भाजीपाला, फळांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशभरात हजारो एकरातील पिके नष्ट झाली आहेत. या घडामोडींमध्ये पाकिस्तानमध्ये भारतासोबत व्यापारी मार्ग खुला करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शहबाज शरीफ सरकारने अद्याप भारताकडून भाजीपाला व फळांच्या आयातीबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनेक व्यापारी संघटनांनी शेजारी देश भारताकडून कांदा, टोमॅटोसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीची मागणी केली आहे.
झी बिझने दिलेल्या वृत्तानुसार, भाजीपाल्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन भारताकडून अन्नधान्य आयातीचा विचार सर्वात आधी अर्थ मंत्री मिफ्ता इस्माइल यांनी सादर केला होता. मात्र, त्यावर विरोधकांनी टीका केली. सद्यस्थितीत पाकिस्तानला ताफ्तान सीमेवरून (बलुचिस्तान) ईराणमधून भाजीपाला आयात करणे व्यवहार्य ठरलेले नाही. कारण इराण सरकारने आयात व निर्यात करात वाढ केली आहे. त्यामुळे फळे, भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटो, कांद्याचा दर ४०० रुपये प्रती किलोपेक्षा अधिक आहे. जर या खाद्यपदार्थांचा पुरवठा लवकर करायचा असेल तर त्याची आयात भारताकडून करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.