इस्लामाबाद : भारताचा शेजारी देश, पाकिस्तानात महागाईमुळे परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की कधी वीज कपात केली जात आहे तर कधी तेलाच्या किमती वाढवल्या जात आहेत. दरम्यान, सध्या पाकिस्तानमध्ये गव्हाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये २३ लाख मेट्रिक टन गव्हाचा तुटवडा आहे. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा मंत्री तारिक बशीर चीमा यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सध्या गव्हाच्या मोठ्या तुटवड्याला तोंड देत आहे.
जागरणमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये २३.७ लाख मेट्रिक टन गव्हाचा तुटवडा आहे असे न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे. यावर्षी देशातील एकूण गहू उत्पादन २६.३८९ दशलक्ष टन झाले. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सांगितले की देशात गव्हाची मागणी २.३७ दशलक्ष टन आहे आणि साठा फक्त २.०३१ दशलक्ष टन राहिला आहे. या टंचाईमुळे देशात आट्यासाठी सुद्धा मारामारी सुरु झाली आहे. खैबर पख्तुनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील काही भागांमध्ये गव्हाचा तुटवडा निर्माण झाला असून, लोकांची धावपळ सुरू आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीचीही माहिती समोर आली असून, आटा मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. गव्हासाठी लोक दररोज तासन तास घालवत आहेत. पाकिस्तानात आधीच आट्याचा तुटवडा आहे, अशातच किमती सातत्याने वाढत आहेत. या परिस्थितीत आटा व्यापारी आणि तंदूरमालक यांच्यातील संघर्षही अनेकदा पाहायला मिळत आहे.