स्कर्दू (पीओके) : पाकिस्तान सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे आणि गव्हाच्या चढ्या किमतींविरोधात आठव्या दिवशीही प्रचंड निदर्शने सुरूच आहेत, असे वृत्त स्थानिक डेली के२ या वृत्तपत्राने दिले आहे. सरकारने सर्वपक्षीय आघाडी, अवामी ॲक्शन कमिटी आणि ग्रँड जिर्गा यांच्या संयुक्त मागणीनंतर गव्हाचा दर प्रती पोते ३६०० रुपये निश्चित केली आहे. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी गिलगिट बिल्टिस्तानच्या स्कर्दूमध्ये विक्री केंद्रांवर एकत्र येवून आंदोलन छेडले आहे. हा भाग पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) क्षेत्रांतर्गत येतो.
नव्या दराने आटा खरेदी करण्यास लोकांनी नकार दिला. सरकारने गरीब विरोधी धोरणे आणली आहेत. त्यामुळे गहू आणि पीठ खरेदी गरिबांच्या क्रयशक्तीच्या बाहेर गेले आहे. सरकारच्या घोषणा खोट्या ठरल्या आहेत, असा आरोप लोकांनी केल्याचे डेली के २ च्या वृत्तात म्हटले आहे. गव्हाच्या किमती वाढल्याने लोकांवर परिणाम होईल. आता सरकारच्या जनतेला प्रचंड जनआंदोलनाला सामोरे जावे लागणार आहे. यादगार चौकात सुरू असलेले जनआंदोलन आठव्या दिवसात दाखल झाले आहे. कडाक्याची थंडी असूनही लोकांनी गव्हाच्या दराबाबत आंदोलन सुरूच ठेवल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वयोवृद्ध आंदोलक आजारी पडले आहेत असेही नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, आंदोलनाविषयी ऑल पार्टी अलायन्सचे अध्यक्ष गुलाम हुसेन अतहर म्हणाले की, ज्यांनी गव्हाचे भाव वाढवले त्यांच्याबद्दल लोकांचा रोष आहे. आम्ही आमच्या मागण्यांपासून एक इंचही मागे हटणार नाही. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते काझीम मैसम म्हणाले की, फक्त गव्हाचे भाव वाढवले जात आहेत असे आम्ही आधीच सांगितले होते. आम्ही जनतेसोबत आहोत आणि याविषयी विधानसभेत आवाज उठवणार आहे. अंजुमन इमामिया बाल्टिस्तानचे अध्यक्ष सय्यद बाकीर अल हुसैनी म्हणाले की, सर्वांनी यादगर चौकातच रहावे. जनतेच्या एकजुटीने या विषयाचा निर्णय होईल.