पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिकच्या म्हणण्यानुसार, खाद्य पदार्थांच्या किंमती गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानातील उर्दू वृत्तपत्र डेली दुनियाने याबाबतचे वृ्त्त दिले आहे.
सन २०२२ मध्ये जेथे २० किलो आट्याचे पोते १४०० रुपयांना मिळत होते, ते आता २३०० रुपयांपेक्षा जास्त किमतीला मिळत आहे. तर एक वर्षामध्ये ब्रेडच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. यापूर्वी ब्रेड १० रुपयंना मिळत होता. आता तो २० रुपयांना विकला जात आहे.
ब्रँडेड कुकिंग ऑईल प्रती लिटर ३०० रुपयांवरून ६०० रुपयांवर पोहोचले आहे. साखरेच्या किमतीतही भरपूर वाढ झाली आहे. यापूर्वी जेथे १ किलो साखर ९० रुपयांना मिळत होती, तीच साखर आता १२५ रुपयांना मिळत आहे. फळे, भाजीपाल्याच्या किमतीही वाढल्या आहेत.
डेली दुनियाच्या म्हणण्यानुसार, सरकारी स्तरावर महागाई नियंत्रणासाठी समाधानकारक उपाय योजना नाही. सरकारी देखरेखीत दलालांचा अडथळा आहे.
एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती घटली आहे. परिणामी लोकांना नाईलाजाने महाग दराने अन्नधान्य खरेदी करावे लागत आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, देशातील सरकारने परिस्थितीत सुधारणा करायला हवी. पुरेसे रोजगार देवून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी संघटित उपाय करून मध्यस्तांविरोधात कारवाईची गरज आहे.
मे महिन्यात पाकिस्तानातील महागाईचा दर सर्वोच्च, ३८ टक्क्यांवर पोहोचल्याचे न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे. अन्नधान्याच्या दरातील अभुतपूर्व वाढीमुळे महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात आधीच्या ३६.४ टक्के दरावरून अधिक वाढ झाली आहे. अधिकृत मासिक महागाईबाबतच्या बुलेटिननुसार गेल्या महिन्याच्या तुलनेत कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये (CPI) १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.