लाहोर : पाकिस्तानच्या एका न्यायालयाने गुरुवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा शाहबाज यांना आठ वर्षे जुन्या भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश सरदार मुहम्मद इक्बाल यांनी हा निकाल दिला. तक्रारदाराने स्वतःला या प्रकरणातून वेगळे केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
तक्रारदार झुल्फिकार अली यांनी न्यायाधीशांना सांगितले की त्यांनी शरीफ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली नाही किंवा ज्या अर्जावर खटला सुरू करण्यात आला होता, त्याची त्यांना माहिती नव्हती. याबाबत एका राजकीय निरीक्षकाने पीटीआयला सांगितले की, “तक्रारकर्त्याच्या विधानावरून असे दिसून येते की लष्कराची शक्ती राजकारण्यांना विविध प्रकरणांमध्ये कसे अडकवते आणि एकदा ते लष्कराच्या बाजूने आले की, अशी प्रकरणे काही वेळातच उलटली जातात.
२०१८ मध्ये, नॅशनल अकाउंटॅब्लिटी ब्युरोने शरीफ आणि हमजा यांच्याविरुद्ध अधिकाराचा गैरवापर करून राष्ट्रीय तिजोरीचे २० कोटी पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. हमजा आणि त्याचा धाकटा भाऊ सुलेमान हे पंजाब प्रांतामधील रमजान साखर कारखान्यांचे मालक आहेत. त्यांच्यावर असा आरोप आहे की शरीफ हे त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी चिनियोट जिल्ह्यात प्रामुख्याने त्यांच्या कारखान्याच्या वापरासाठी नाला बांधण्याचे निर्देश दिले होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.