पाकिस्तानमध्ये आणखी एक संकट : साखर प्रती किलो १८५ रुपयांवर

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साखरेच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. साखरेचा दर प्रती किलो १८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, देशाच्या आर्थिक समन्वय समितीने (ईसीसी) संबंधित एजन्सींना साखरेचा साठा आणि तस्करीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. डॉन या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

साखरेच्या वाढत्या घाऊक दरांमुळे विविध ऑनलाइन मार्ट आणि रिटेल शॉप ऑपरेटर्सना आधीच्या साठ्यावर कमाईची संधी मिळाली आहे. तर अफगाणिस्तानात विविध मार्गांनी साखरेची तस्करी सुरूच आहे. याशिवाय, साखरेची साठेबाजी आणि सट्टेबाजी सुरू असल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला आहे. याबाबत डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, देशातील साखरेचा साठा २.२७ दशलक्ष टनांवर असताना दरवाढ ही आश्चर्यकारक बाब आहे.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानकडील साखर निर्यात २,१५,७५१ टन होती. आधीच्या आर्थिक वर्षातील, २०२२च्या तुलनेत पाकिस्तानने १०४ मिलियन डॉलरची कमाई केली. जुलै २०२२ मधील शून्य निर्यातीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ५,५४२ टन साखर निर्यात करण्यात आली. त्यापासून ३.४ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे.

पाकिस्तान सरकारने साखर दरवाढ न करण्याच्या अटीवर पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनला २,५०,००० टन साखर निर्यातीस परवानगी दिली होती. असोसिएशनने आर्थिक वर्ष २२ मध्ये साखरेचा दर ८५-९० रुपयांपेक्षा अधिक केला जाणार नाही, अशी हमी दिली होती.

दरम्यान, कराची होलसेलर्स ग्रोसर्स असोसिएशन (केडब्ल्यूजीए) चे अध्यक्ष रौफ इब्राहिम यांनी काळजीवाहू सरकारला या आश्वासनाचे पालन कधी केले जाईल, अशी विचारणा पत्राद्वारे केली आहे. एक ऑगस्टपासून घाऊक साखरेच्या दरात २१ रुपये प्रती किलो वाढ झाली आहे. साखर कारखान्यांचा साठा आणि गुंतवणूकदार, सट्टेबाजांकडील साठेबाजी तपासण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने साखर, गहू, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक पदार्थांच्या दरवाढीची स्वतःहून दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. अफगाणिस्तानमधील तस्करीमुळे सरकारचा महसूल बुडत असल्याचे रौफ म्हणाले. (एएनआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here