पाकिस्तानातील साखर कारखानदारांनी ऊस दरात वाढ करणाऱ्या दलालांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने साखरेचा दर वाढविण्याचा इशारा दिला आहे.
पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या (पीएसएमए) एका प्रवक्त्यांनी सांगितले की, ऊसाचा दर ३०० रुपये प्रती ४० किलोवर आहे. मध्यस्त, दलालांच्या अवैध पद्धतीमुळे साखर उत्पादनाचा खर्च सातत्याने वाढत आहे. कारण, एकूण खर्चाच्या ८० टक्के रक्कम ऊसासाठी द्यावी लागते. विभागातील सरकारांकडून दलालांविरोधात कठोर कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रवक्त्यांनी सांगितले की, दलाल शेतकऱ्यांकडून कमी दरात ऊस खरेदी करून कारखान्यांना चढ्या दराने विक्री करत आहेत. इस्लामाबादमध्ये साखर सल्लागार बोर्डाच्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या बैठकीनंतर उद्योग सचिवांनी त्या-त्या प्रांतातील सरकारांना मध्यस्तांना दूर सारावे असे निर्देश दिले होते. मात्र, त्यांच्याकडून ही अवैध पद्धती तशीच सुरू राहिली आहे. कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस मिळत नसून गाळपात अडथळे येत असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.