कराची : साखर उत्पादनातील घसरणीमुळे पाकिस्तानातील सत्तारुढ तहरिक ए इन्साफ (पीटीआय) सरकारला आगामी काळात साखरेच्या किंमती कमी करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पीटीआयचे प्रमुख जहाँगीर खान तारेन यांच्या अधिपत्याखालील जेडीडब्ल्यू साखर कारखान्याने २ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, आगामी काळात बाजारात साखरेच्या किमती उच्च स्तरावरच राहतील अशी शक्यता आहे.
देशात एकूण उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी २० टक्के उत्पादन जेडीडब्ल्यू साखर कारखान्याकडून केले जाते. सरकार नेहमीच्या पद्धतीने साखर उद्योगाकडून उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाच्या कमी दरावर साखरेची विक्री करण्याची अपेक्षा करीत आहे. यापूर्वी नोव्हेंबर ते मार्च या गळीत हंगामासाठी उसाचे गाळप सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच देशभरातील किरकोळ बाजारपेठेत साखरेची किंमत सरासरी ८० रुपयांपर्यंत घसरली होती.
मात्र, देशातील इस्लामाबाद आणि रावळपिंडीसारख्या काही भागात साखरेच्या किमती पुन्हा १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्च ते मे २०२० या दरम्यान, किरकोळ बाजारात कमोडीटीमध्ये साखरेचे दर ११० रुपये किलोवर पोहोचले होते. त्यावेळी साखर माफियांनी मार्केटमध्ये साखरेच्या किमतीत कृत्रीम भाववाढ केल्याचा आरोप सरकारने केला होता.