लाहोर : चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या कारखान्यांवर कारवाईचा इशारा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे ऊस आयुक्त मुहम्मद जमान टैटू यांनी दिला आहे. ज्या साखर कारखानदारांनी २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपल्या कार्यालयात ऊसाच्या थकबाकी किती दिली याचा अहवाल सादर न केलेल्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
वेळेवर अहवाल आणि माहिती सादर करण्यास टाळाटाळ केलेल्या कारखानदारांवर कडक कारवाई केली जाईल असे ऊस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मेसर्स अल मोईज २ शुगर मिल्स लिमिटेड, मियांवली, एडम साखर कारखाना लिमिटेड, बहावलनगर, अल-अरबिया साखर कारखाना सरगोधा, बाबा फरीद साखर कारखाना लिमिटेड ओकारा, दरिया खान साखर कारखाना लिमिटेड भक्कर, एतिहाद साखर कारखाना लिमिटेड रहीम यार खान आणि फातिमा साखर कारखाना लिमिटेड मुजफ्फरगढ यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिशीत म्हटले आहे की, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी साखर कारखान्यांना या विषयावर एक नोटीस पाठविण्यात आली होती. त्यामध्ये पंजाब साखर कारखाना नियंत्रण अधिनियम १९५०च्या नियम १४ (२) अन्वये ऊस कारखान्यात आल्यानंतर पंधरा दिवसात पैसे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र, पैसे देण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, काही कारखान्यांना उर्वरीत पैसे देण्यासाठी आधी २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.