इस्लामाबाद : साखरेचा साठा, पुरवठ्याची स्थिती आणि बाजारातील किंमती याच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश अर्थ आणि महसूल मंत्री डॉ. अब्दुल हफीज शेख यांनी उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाला दिले आहेत. मंत्री शेख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राष्ट्रीय किंमत देखरेख समितीची बैठक झाली. तेव्हा त्यांनी साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
गेल्या आठवड्यात एनपीएमसीच्या झालेल्या बैठकीत जीवनवश्यक वस्तूंपैकी पीठ, अंडी, चिकन, साखर आणि खाद्यतेलाच्या किमतीचा आढावा घेण्यात आला. एनपीएमसीने जीवनशावश्यक वस्तूंच्या किमतीबाबत अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी संबंधित मंत्रालय, विभाग आणि त्या – त्या प्रांतातील सरकारांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. सामान्य जनतेला अधिक दिलासा देण्यासाठी हे प्रयत्न कायम ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
अर्थ मंत्री डॉ. अब्दुल हफीज शेख यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाच्या (एनएफएस अँड आर) सचिवांनी गव्हाच्या साठ्याबद्दल एनपीएमसीला माहिती दिली. साठेबाजी, काळाबाजार आणि तस्करीपासून बचावासाठी बाजारात गहू आणि साखरेच्या किमतीवर कडक नियंत्रण ठेवावे आणि धान्य स्वस्त किमतीत उपलब्ध करून देण्याबाबत लक्ष द्यावे असे एनपीएमसीने प्रांतांमधील सरकारांना सांगितले. अद्ययावत माहितीनुसार, चालू गळीत हंगामात साखरेचे उत्पादन वाढेल असे अनुमान असल्याचे सचिवांनी सांगितले.