लाहोर : लाहोर चेंबरच्या सदस्यांच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपने साखरेच्या दररोज वाढत असलेल्या किमतींबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लागू करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे अध्यक्ष खालिद उस्मान, वरिष्ठ उपाध्यक्ष मुहम्मद अर्शद चौधरी आणि एलसीसीआय कार्यकारी समितीचे सदस्य मुहम्मद इजाज तन्वीर आणि हाजी रियाज उल हसन यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, साखरेच्या बेलगाम वाढत असलेल्या दरामुळे केवळ उद्योगच नव्हे तर सर्वसामान्य जनतेवरही विपरीत परिणाम होत आहे.
त्यांनी दावा केला की, खाद्यपदार्थांसंबंधी उद्योग, हॉटेल, रेस्तराँ, शितपेये आणि सर्वाधिक कन्फेन्शनरी क्षेत्राला याचा फटका बसत आहे. आणि थेटपणे यांच्याशी संलग्न उद्योगांतील उत्पादनांना सर्वसामान्य जनतेच्या कक्षेपासून दूर केले जात आहे. प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या नेत्यांनी म्हटले आहे की, साखरेच्या वाढत्या किमतीमागे केवळ साखर माफियाच नव्हेत तर साठेबाजही कारणीभूत आहेत. आणि सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे.
महागाई आधीच वाढत आहे आणि याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या घराच्या बजेटवर पडत आहे. ते म्हणाले की, साखरेच्या दरातील अनियंत्रित वाढीमुळे केवळ किमती वाढत नाहीत तर याच्या तुटवड्याची भीतीसुद्धा वाढत आहे. अशा स्थितीत सरकारला साखरेची आयात करावी लागेल. त्यामुळे देशाच्या खजिन्यावर, राष्ट्रीय परकीय चलनाच्या साठ्यावर बोजा पडेल.