इस्लामाबाद : साखरेच्या दरवाढीमुळे साखर कारखान्यांनी ५०० बिलियन रुपयांपेक्षा (PKR) जास्त कमाई केली असेल असा आरोप राजकीय पक्ष पीटीआयने केला आहे असे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र dawn ने दिले आहे. पीटीआयचे प्रवक्ते मुजम्मिल अस्लम यांनी गुरुवारी सांगितले की, गेल्या तीन ते चार महिन्यांत साखरेच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे महागाईशी झुंज देणाऱ्या जनतेचे हाल आणखी वाढले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अस्लम यांनी दावा केला आहे की, जेव्हा पीटीआयचे सरकार एप्रिल २०२२ मध्ये, १६ महिन्यांपूर्वी सत्तेतून बाहेर पडले, तेव्हा साखर ८० ते ८५ रुपये किलो दराने उपलब्ध होती. मात्र आता ती १५० ते १७० रुपये किलोने विकली जात आहे.
पाकिस्तानात साखरेचा वार्षिक खप सहा दशलक्ष टन असल्याचा दावा त्यांनी केला. ८५ रुपये किलोने दर वाढल्यास साखर कारखानदारांना प्रती टन ८५००० रुपये मिळतील, असे सांगून ते म्हणाले की, एकूणच साखर कारखान्यांना ५१० अब्ज रुपये मिळतील. सरकारने साखर कारखानदारांच्या नफ्यावर कर लादल्यास, वीजबिलात जनतेला मोठा दिलासा देण्यासाठी आर्थिक कोष असेल, असा दावा अस्लम यांनी केला.