पाकिस्तानने भारतकडून साखर आयात करण्याच्या आपल्या निर्णयापासून यू-टर्न घेतला आहे. पाकिस्तानी मंत्रिमंडळाने गुरुवारी भारताकडून साखर, कापूस आयात करण्याच्या आर्थिक समन्वय परिषदेचा (ईसीसी) प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीचे निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री हम्माद अजहर यांनी बुधवारी भारताकडून साखर आयातीची घोषणा केली होती. ईसीसीने खासगी क्षेत्राला ०.५ मिलियन टन पांढरी साखर आयात करण्यास मंजूरी दिली होती. पाकिस्तानातील साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
इस्लामाबादमध्ये अजहर यांनी एका परिषदेत सांगितले होते की, जर एखाद्या देशाशी व्यापार पुन्हा सुरू केल्याने जर सामान्य माणसावरील आर्थिक ओझे कमी होत असेल तर यात वाईट काहीही नाही. आमचा शेजारी देश भारतामध्ये साखरेचा दर पाकिस्तानच्या तुलनेत खूप कमी आहे.
भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे तर साखरेच्या उत्पादनात द्वितीय क्रमांकावर आहे. पाकिस्तानमध्ये साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर पाकिस्तानने भारताकडून साखर आयात केली असती, तर रमजान महिन्यापूर्वी साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते