इस्लामाबाद : द न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानमधील गव्हाचे उत्पादन उद्दिष्टामध्ये १.७ मिलियन टनाने कपात होण्याची शक्यता आहे. २८.४ मिलियन टनाच्या अनुमानीत लक्ष्याच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन २६.७ मिलियन टन राहिल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पंजाबमधील गहू उत्पादनाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील आर्थिक वर्षातही गव्हात मोठी घट होईल असे अनुमान आहे. आणि यांदरम्यान सरकारला देशांतर्गत गव्हाची गरज भागविण्यासाठी गव्हाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागले. गव्हाची आयात अशा वेळी वाढणार आहे, ज्या काळात पाकिस्तानला डॉलरच्या तरलतेमध्ये सर्वाधिक खराब स्थितीचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तानकडे देशांतर्गत आणि यासोबतच अफगाणिस्तानच्या गरजांना भागविण्यासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी ३ ते ३.५ मिलियन टन गहू आयात करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. चालू आर्थिक वर्षासाठी २.६ मिलिय टनाच्या गव्हाच्या आयात उद्दिष्टापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, हवामान विभागाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून दोन आठवडे जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर होईल. गव्हाचे उत्पादन उद्दिष्टही यातून अडचणीत येऊ शकते. कारण, देशात मार्च, एप्रिल आणि पुढील तीन महिन्यांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा वेगवेगळ्या वेळी उद्भवू शकतो, असा इशारा हवामान विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयासोबतच्या आपल्या पुर्वानुमानामध्ये दिला आहे. सरकारला पुढील वर्षात किमान ३.५ ते ४ मिलियन टन गव्हाची आयात करावी लागेल. मात्र, सद्यस्थितीत देशात डॉलर तुटवड्याची गंभीर स्थिती आहे.