आधार आणि पॅन कार्डाचे लिंकिंग करण्यासाठीची मुदत वाढवून ३० जून २०२१ करण्यात आली आहे. आधाची मुदत ही ३१ मार्च २०२१ पर्यंत होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आता नागरिक ३० जून २०२१ पर्यंत आधार क्रमांकाशी पॅनकार्ड लिंक करू शकणार आहेत.
काल, बुधवारी अखेरचा दिवस असल्याने आयकर विभागाच्या वेबसाइटवर लिकिंगसाठी ट्रॅफिक वाढल्याने साइट क्रॅश झाली. विभागाची अधिकृत साइट क्रॅश झाल्यानंतर अनेकांना आपले पॅन-आधार लिंकींग करता आले नाही. जर ३१ मार्च २०२१ पर्यंत पॅन-आधार लिंकिंग केलेले नसेल तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल असा इशारा बँकांनी आधीच दिला होता. त्याचा थेट परिणाम बँकिंग ट्रान्झॅक्शनवरही होणार आहे.
साइट क्रॅश झाल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. जर ३१ मार्चपर्यंत लिंकिंग केलेले नसेल, तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय १००० रुपये दंडही भरावा लागेल या नियमाची माहिती सर्वत्र पसरल्याने गोंधळ वाढला.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आयकर विभागाची वेबसाइट क्रॅश झाली. त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली. मात्र, साइट रात्री उशीरापर्यंत क्रॅश होत राहिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी सोशल मीडियावर आयकर विभागाने मुदत वाढवावी अशी मागणीही केली होती.