सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरळीत आहे. कारखान्याने नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासले आहे. हंगामात गाळपास येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देणार आहे. सध्या कारखाना प्रतिदिन सरासरी ८५०० मेट्रिक टनाप्रमाणे ऊस गाळप करीत आहे. कारखान्याचे या हंगामात १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना ते पूर्ण करणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी केले. कारखान्याच्या चालु गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १,२१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक सुदाम मोरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष कैलास खुळे, संचालक दिनकरराव मोरे, उमेश परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक उपस्थित होते. शासनाने सिरप ते इथेनॉल वरील बंदी उठविल्यामुळे कारखान्याचे सुमारे १२०० ते १५०० टन गाळप जास्तीचे होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप होईल असे चेअरमन परिचारक म्हणाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, ऊसतोडी वेळेवर करण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. या हंगामात कारखान्याचे १७ दिवसात १ लाख ३३ हजार टन ऊसाचे गाळप करून १ ,२१, १११ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. को-जनरेशनमधून ७५ लाख युनिट वीज निर्मिती केली असून, आसवानी प्रकल्पातून ११ लाख बल्क लिटर्स उत्पादन घेतले आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.