सोलापूर : येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस साठवणुकीच्या यार्डमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी दुपारी साडेचार वाजता हा आगीचा प्रकार घडला. उन्हाच्या उष्णतेमुळे स्पार्किंग होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे तांडव सुरू झाले. अग्निशामक यंत्रणेने परिश्रम करून आग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमारे आठ ते दहा हजार मेट्रिक टन बगॅस वाचले.
कारखान्यात को-जनरेशन व डिस्टिलरी प्रकल्प सुरू असल्याने योग्य ठिकाणी आणण्याचे काम सुरू होते. याकरिता पोकलेन मशीन काम करीत होते. त्याचठिकाणी अचानक आग लागली. तातडीने पांडुरंग कारखान्याची अग्निशामक यंत्रणा, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना व माळीनगर साखर कारखाना आदींच्या अग्निशामक यंत्रणेला बोलावण्यात आले. त्यांनी परिश्रम करून आग आटोक्यात आणली. उन्हाच्या तीव्र झळा व वादळी वारे सुरू असल्याने बगॅसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.