रेणापूर : गेल्या १५ महिन्यांपासून थकीत असलेला पगार मिळावा, भविष्य निर्वाह निधी १५ ऑक्टोबरपर्यंत जमा व्हावा या मागणीसाठी पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर डिझेल, पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तातडीने २२ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. साखर कारखान्याच्या सुरक्षा विभाग, इलेक्ट्रीशियन वायरमननी कारखाना प्रशासनास २१ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र, कारखाना प्रशासनाने, साखर संघाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले.
२००० मध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला पन्नगेश्वर कारखाना २०१६ पर्यंत सुरळीत होता.मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शेतकरी, ठेकेदारांची देणी थकीत आहेत. इतर विभागातील कर्मचारी कारखाना सोडून गेले अस,ले तरी सुरक्षा विभागाचे कर्मचारी नियमित कामावर आहेत. गेल्या पंधरा महिन्यांपासून या सुरक्षा रक्षकांना पगार मिळालेला नाही. थकीत पगारासाठी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.