परभणी : रेणुका-देवनांद्रा साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

परभणी : रेणुका साखर कारखाना देवनांद्राची गाळप क्षमता वाढवण्यासाठी जानेवारी महिन्यात साखर आयुक्त, साखर संचालक, कारखाना व्यवस्थापन, कामगार शेतकरी प्रतिनिधी व याचीकाकर्ते अशी संयुक्तिक बैठक घेतली जाईल. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यास मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. नागपूर येथे आमदार राजेश विटेकर, कृऊबासचे सभापती अनिलराव नखाते यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

रेणुका साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतीदीन १२५० मे. टन आहे. कारखान्यास आणखी प्रतिदिन ५ हजार टन क्षमता वाढवून मिळाली तरीही ते पुरेसे ठरणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान मानवत येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागातील साखर कारखान्यासह इतर महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकप्रकारे पालकत्व घेतल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर नूतन आमदार आमदार राजेश विटेकर यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

पाथरी, मानवत, सोनपेठ भागातील शेतकऱ्यांचा ऊस हा कारखाना एकट्याने गाळप करू शकत नाही. योगेश्वरी नृसिंह, जय महेश, जी सेव्हन, २१ महाराष्ट्र शुगर हे कारखाने या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करतात. मात्र, रेणुका कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्यास त्याचा फायदा होईल असे शिष्टमंडळाने सांगितले. राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष अंकुश लाड, मानवत कृऊबासचे सभापती पंकज आंबेगावकर आदींनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here