परभणी : बळिराजा साखर कारखान्याकडून ८८ कोटींची ऊस बिले अदा

पूर्णा : येथील बळिराजा साखर कारखान्याने दोन मार्चअखेर ऊस उत्पादकांना कारखान्याने कराराप्रमाणे ८८ कोटी १३ लाखांचे वाटप केले आहे. कारखान्याने या हंगामात मागील १०७ दिवसांत साखर कारखान्याने पाच लाख एक हजार ४६० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने पाच लाख ४२ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. विशेष म्हणजे ११.३९ टक्के असा विक्रमी साखर उतारा यावर्षी कारखान्याने मिळवला आहे. कारखान्याच्यावतीने आगामी पंधरा दिवसांत अजून १६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की, कारखान्याच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून साखर कारखान्याने लक्षवेधी काम केले असून एक कोटी ९३ लक्ष ५० हजार युनिट वीज महावितरणला पाठवली आहे. यावर्षी साखर कारखान्याने सुमारे ३००० रुपये प्रतिटन भाव देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले होते. यंदा कारखान्यात उसाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीटन ३,००० रुपये व त्यानुसार पहिली उचल २५०० रुपये दिली आहे. उर्वरित करारानुसार दोन हप्त्यामध्ये एफआरपी प्रमाणे देण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी संचालक अजय जाधव, संचालक अमित जाधव, संचालक दिनकरराव जाधव, सरव्यवस्थापक भगवानराव मोरे, वरिष्ठ अधिकारी तुकाराम सुरवसे, किरण मगर, रमेश पौळ, नितीन गणोरकर, मदन देशमुख, विनायक कदम, रामजी शिंदे, बाळासाहेब तिडके, विनायक कऱ्हाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here