लखनौ : कोरोनाचा पुन्हा वाढत असलेला प्रसार पाहता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विमान प्रवास करून उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या महाराष्ट्र आणि केळमधील सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या सर्वांची अँटीजेन चाचणी विमानतळावरच केली जाणार आहे. जे लोक पॉझिटिव्ह येतील, त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइन केले जाईल. त्यांचे सँम्पल घेऊन आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. आरटी-पीसीआर परीक्षणात जे लोक निगेटिव्ह येतील, त्यांना एका आठवड्यासाठी होम क्वारंटाइन केले जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. रेल्वे आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांसोबतही अशाच पद्धतीने टेस्ट केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे आदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, राज्यात दररोज किमान १.२५ लाख टेस्ट झाल्या पाहिजे हे निश्चित करण्यात आले आहे. काही इतर राज्यांमध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता उत्तर प्रदेशमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि उपचारांसाठी अधिक चांगली व्यवस्था केली गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले.