बीड : ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीवाढीबाबत साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची बैठक बुधवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झाली. ऊसतोड मजुरांची मजुरी वाढ आणि संपाच्या इशाऱ्यावर बैठकीत चर्चा झाली. कामगारांच्या मजुरीत २९ टक्के वाढीची तयारी साखर संघाने दाखवली. परंतु ही दरवाढ ४० टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने अंतिम निर्णय घ्यावा, यावर साखर संघ व ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले.
५ जानेवारीपर्यंत पवार – मुंडे लवादाची बैठक होणार आहे. यात ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मांजरीतील बैठकीस साखर संघाचे अध्यक्ष पीआर पाटील, उपाध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, ज्येष्ठ संचालक जयप्रकाश दांडेगावकर तर ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीने आ. सुरेश धस, गोरक्ष रसाळ, श्रीमंत जायभाये, कृष्णा तिडके, दत्तोबा भांगे, डी. एल. कराड, गहिनीनाथ थोरवे, सुखदेव सानप, सुरेश वनवे, जीवन राठोड आदी उपस्थित होते.