कोल्हापूर : आजरा कारखान्याने जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या संपूर्ण उसाची बिले विनाकपात एकरकमी, तोडणी वाहतुकीची बिलेदेखील नियमितपणे आदा केली आहेत. यंदा गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. येणाऱ्या गळीत हंगामाचे नियोजन केले असून, सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा उभारून ४ लाख मे टन गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिली.
आजरा कारखान्याने १ फेब्रुवारी ते हंगाम अखेर गाळप झालेल्या उसाची बिले विनाकपात ऊसपुरवठा शेतकऱ्यांची व तोडणी वाहतुकीची बिले सुमारे २२ कोटी १० लाख रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यंदा संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामामुळे व करार झालेल्या टोळ्या न आल्याने गळितावर परिणाम झाला. आता वाहतूक ठेकेदारांनी कारखान्याशी संपर्क साधून तोडणी – ओढणीचे करार करावेत असे आवाहन अध्यक्ष धुरे यांनी केले. उपाध्यक्ष मधुकर देसाई, संचालक विष्णू केसरकर, उदय पोवार, मुकुंद देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, रचना होलम, मनीषा देसाई, नामदेव नार्वेकर, रशीद पठाण, प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती आदी उपस्थित होते.