बरेली : साखर कारखान्यांनी जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उसाचे थकीत पैसे दिले नाहीत, तर आंदोलना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिला आहे.
पिलिभीत येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना खासदार गांधी म्हणाले की, जर साखर कारखान्यांनी त्वरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, त्यांनी पुरवठा केलेल्या उसाचे पैसे देण्यास सुरुवात केली नाही तर शेतकऱ्यांकडून कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलने सुरू केली जातील. देशातील वाढत्या बेरोजगारीबाबतही वरुण गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, देशभरात जवळपास एक कोटी सरकारी पदे रिक्त आहेत. सरकारने या पदांची भरती करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू केली पाहिजे. यासाठी आम्ही मदत करण्यास तयार आहोत.