सातारा : साखर कारखानदारांनी उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये दिवाळीपूर्वी देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यंदाच्या उसाला ४००० रुपये प्रती टन दर द्यावा, यासाठी आम्ही खर्डाभाकरी खाऊन आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कारखानदारांना त्याचे आदेश द्यावेत. उसाला अपेक्षित दर न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करू, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला. संघटनेच्यावतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
संघटनेच्यावतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने एफआरपीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. तर साडेचार हजार रुपये दर देणे शक्य आहे असे मत समीर देसाई यांनी व्यक्त केले. दिवाळीपूर्वी पाचशे रुपयांचा दुसरा हप्ता न दिल्यास कारखानदारांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करण्याचाही इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख, युवा प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, आटपाडी तालुकाध्यक्ष दिगंबर मोरे, शेकापचे समीर देसाई, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात, प्रकाश पाटील, पोपटराव जाधव, दीपक पावणे, शंभूराजे पाटील, सुनील कोळी आदी यावेळी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.