बेळगाव : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व बिले तीन हजार रुपये दराने दिली आहेत. तर १ ते १५ जानेवारीपर्यंत ऊसतोड झालेल्या १,००,५७० मेट्रिक टन उसाचे बिल ३०.१७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कारखान्याचे मार्गदर्शक खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली गळीत हंगाम जोमाने सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने २७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ५,४७, ३७२ टन उसाचे गाळप करून ५,३७,६५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १०.७८ टक्के आहे. कारखान्याने यापुढे गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाची बिले त्वरित देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे.