बुलंदशहर : संचालनालयाच्या निर्देशानंतर जिल्हा ऊस विभागाने कारवाईच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे चार साखर कारखान्यांनी एका आठवड्यात ६७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १.८३ कोटी रुपये थकीत आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने पैसे देण्याच्या प्रक्रियेत विभागात पहिल्या क्रमांकावर आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी सांगितले की, होळीपूर्वी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले द्यावीत यासाठी प्रयत्न केले गेले. गेल्या गळीत हंगामातील पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. गेल्या एका आठवड्यात अनामिका साखर कारखान्याने ९२७.०३ लाख रुपये तर साबितगढ कारखान्याने २३ मार्च रोजी ११३२.२९ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा केले. याशिवाय, २७ मार्च रोजी ११६६.८८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. वेव साखर कारखान्याने ६९९.४० लाख रुपये दिले आहेत. तर अनुपशहर साखर कारखान्याने २२४.३२ लाख रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. चालू गळीत हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांना ३५३८८.४२ लाख रुपये देण्यात आले आहेत.