दुसरा हप्ता द्या, अन्यथा आंदोलन करू : ‘आंदोलन अंकुशचा इशारा

पुणे : मागील हंगामातील दुसऱ्या हप्त्याबाबत आंदोलन अंकुशने आक्रमक भूमिका घेतली आहे. साखर कारखान्यांच्या मागील हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे प्रस्ताव मंजूर करून कारखान्यांना पाठवावे अन्यथा, साखर आयुक्तालय आणि कारखान्यांसमोर आंदोलन करू, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे दिला होता. यावर सात कारखान्यांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्या प्रस्तावांवर शासनाचा अभिप्राय मागविला आहे. तो आल्यानंतर तत्काळ पैसे देण्याचे आदेश देऊ, असे आश्वासन तत्कालीन साखर आयुक्त अनिल कवडे यांनी ‘आंदोलन अंकुश’च्या शिष्टमंडळाला दिले.

मागील गळीत हंगामात गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेला आहे, अशा कारखान्यांचे १०० रुपये व तीनशे रुपयांपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्याने ५० रुपये अतिरिक्त फायद्यातील दुसरा हप्ता साखर आयुक्तांची मंजुरी नसल्याने दिलेला नाही. दोन महिन्यांत दुसरा हप्ता देण्याचे कारखान्यांनी मान्य करून तशी संमतीपत्रे जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. सध्या दोन महिने संपूनही साखर कारखान्यांकडून मागील हंगामाचा दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तत्काळ कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर करून शंभर रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, संभाजी शिंदे, श्रीकांत गावडे, महेश जाधव, दत्तात्रय जगदाळे, एकनाथ माने यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here