लक्सर : सरकारकडून अद्याप किमान ऊस आधार किंमत जाहीर केली नसल्याने लक्सर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ३८.६५ कोटी रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट करण्यात आले. कारखान्याने यापूर्वी एक जानेवारी रोजी २७.२८ कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान, ऊस दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
जिल्ह्यात सध्या तीन साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सुरू आहे. लक्सर साखर कारखान्याने १६ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केले आहे. सरकारने अद्याप उसाची आधार किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या दरानुसारच अॅडव्हान्स पेमेंट करण्यात येत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला लक्सर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २७.२८ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. आता दुसऱ्यांदा एक डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीतील ३८.६५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. लक्सर साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक अजय खंडेलवाल म्हणाले, सरकारकडून अद्याप उसाची किमान आधार किंमत जाहीर झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन गेल्यावेळच्या दरानुसार बिले देण्यात येत आहेत. सरकार जेव्हा दर जाहीर करेल, तेव्हा उर्वरीत पैसे दिले जातील.
दरम्यान, दर जाहीर झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकरी कुशलपाल सिंह, राजपाल सिंह, जयपाल फौजी आदींच्या म्हणण्यानुसार, कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, सरकारने किमान आधार किंमत जाहीर केलेली नाही. सरकारने तातडीने ऊस दर जाहीर करण्याची गरज आहे.