मंड्या : म्हैसूर शुगर कंपनीच्या (माय शुगर फैक्ट्री) कर्मचाऱ्यांना चौथ्या वेतन आयोगानुसार थकीत वेतन देण्यात आले आहे. उपायुक्त एच. एन. गोपालकृष्ण यांनी मंड्या येथे कारखान्याच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना धनादेशाचे वितरण केले. राज्याच्या मालकीचा माय शुगर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
गोपालकृष्ण म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी थकीत वेतनाबाबत केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून गोदामामध्ये ठेवण्यात आलेल्या साखरेची यासाठी विक्री करण्यात आली. साखरेच्या विक्रीतून एकूण ८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्या रक्कमेचा वापर पेन्शन, वैद्यकीय बिले आणि इतर कारणासाठी करण्यात आला आहे. याशिवाय १,१२७ कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसाठीही कारखान्याच्या चौथ्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यवाही करण्यात आली. प्रातिनिधीक स्वरुपात १५ कर्मचाऱ्यांना धनादेश देण्यात आले. उर्वरीत कर्मचाऱ्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम पाठविण्यात येणार आहे.
मायशुगरचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब पटेल यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळावी यासाठी श्रमिक संघाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. राज्याच्या मालकीच्या म्हैसूर शुगर कंपनील लिमिटेडला गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. चालू हंगामात कारखान्याला ४ हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.