कोल्हापूर विभागात १ हजार ३२२ कोटींची ऊस बिल थकबाकी

कोल्हापूर : चीनी मंडी

ऊस बिलाच्या थकबाकीचा प्रश्न सध्या गाजतो आहे. कोल्हापूर विभागाचा विचार केला तर, या विभागात एकूण १ हजार ३२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे शेतकरी एक रकमी एफआरपीची मागणी करत आहेत. तर, दुसरीकडे कारखाने एफआरपी एक रकमी देणे शक्य नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे.

ऊस गाळप हंगाम सुरू होऊ दोन महिने होत आले तरी, कोल्हापूर विभागात एफआरपीची बिले निघालेली नाहीत. सांगली जिल्ह्यातील सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याने ३७ टक्के एफआरपी दिली आहे. या व्यतिरिक्त एकाही कारखान्याने एफआरपीचे बिल दिलेले नाही.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यात एकूण ३७ साखर कारखाने आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर १५ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर या सगळ्या कारखान्यांची मिळून १ हजार ३२२ कोटी २० लाख रुपये इतकी ऊस बिल थकबाकी आहे. सांगलीच्या सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याने ५३ कोटी ७० लाखांपैकी २० कोटी ६७ लाख रुपयांची बिले ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहेत. त्यांचीही अजून ३३ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

कारखाना निहाय थकबाकीचा विचार केला तर, त्यात दत्त-शिरोळ कारखान्याची सर्वाधिक ७ हजार ३१५.६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापाठोपाठा हेमरस-चंदगडची ७ हजार ०२१.४३, हुपरीच्या जवाहर कारखान्याची ५ हजार ६९२.४६, कापशीतील संताजी घोरपडे कारखान्याची ४ हजार ६६३.२९ लाख, हमीदवाड्यातील मंडलिक कारखान्याची ३ हजार ८१८.०७, भोगावती कारखान्याची ३ हजार ७७३.६७, कागलच्या शाहू कारखान्याची ३ हजार २१२.६४ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमध्ये हे कारखाने आघाडीवर आहेत.

सांगली जिल्ह्यातही फारशी समाधानकारक स्थिती नाही. साखराळे साखर कारखान्याच्या १ युनिटची ६ हजार २०.२४ लाख, विश्वासराव नाईक कारखान्याची थबकाबी ५ हजार ९०२.५० लाख तर, कुंडलच्या क्रांती कारखान्याची थकबाकी ५ हजार ४४७.५३ लाख थकबाकी आहे. सोनहिरा साखर कारखान्याची थकबाकी ५ हजार ६४९.५२ लाख, तर उदगिर शुगर्सची थकबाकी ४ हजार ४७०.७९ लाख आहे.

साखरेचे दर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत घसरल्याने कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. निर्यातही अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने पॅकेज जाहीर केल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे डोळे सरकारकडे लागले आहेत.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here