सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने २०२३ २४ या गळीत हंगामात उसाच्या अंतिम एफआरपीपोटी प्रती टन १५१ रुपये याप्रमाणे होणारी ३.३८ कोटी रुपयांची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून कारखान्यातील मेंटेनन्सचे कामकाज प्रगतीपथावर आहे. एफआरपीपोटी यापूर्वीच प्रती टन २६५० रुपयांप्रमाणे ५९.४६ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत असे त्यांनी सांगितले.
याबाबत प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे की, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत आहे. कारखान्याने २०२३-२४चे गळीत हंगामामध्ये २,२४,४१३.६५२ मे. टन ऊस गाळप केले. सरासरी ११.९८ टक्के साखर उताऱ्याने २,६८,७७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. उर्वरित अंतिम एफआरपी १८ सप्टेंबर रोजी सभासदांच्या बँक खात्यात अदा केली आहे. ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. नव्या हंगामासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यशराज देसाई यांनी केले आहे.