बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. गेल्या दोन हंगामात राज्यात व देशातील साखर कारखानदारी आर्थिक संकटात असतानाही कारखान्याने तोटा सहन करून शासनाने ऊसाला ठरवलेल्या हमीभावापेक्षा जास्त दर दिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक तथा आ. प्रकाश सोळंके यांनी केले. साखर कारखान्याची अधिमंडळाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन विरेंद्र सोळंके होते. मार्गदर्शक धैर्यशील सोळंके, जयसिंग सोळंके यांच्यासह सर्व संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत आ. सोळंके यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शासनाचा २०२०-२१ चा उत्कृष्ट भाषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल कारखान्याच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आ. सोळंके म्हणाले की, मागील वर्षी आपले कारखान्याने इथेनॉल उत्पादन क्षमता ४५००० लिटर क्षमतेहून १५०००० लिटर प्रती दिन वाढवली आहे. त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नातुन सर्वाधिक भाव देणे शक्य झाले असते. परंतु केंद्र शासनाने अचानक सिरप व उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस बंदी घातली. त्याचा फटका बसला. मात्र चालु हंगामासाठी ही बंदी उठवली आहे. त्यामुळे चांगला दर देता येईल. चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले. जेष्ठ संचालक आ. प्रकाश सोळंके यांनी विषयनिहाय ठरावाचे वाचन केले. त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर व सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. संचालक छगनराव जाधव यांनी आभार मानले.