मुंबई दि.७: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन तसेच आयसीयू देखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली तरी आता पुढच पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरुपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या सहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहीसर येथे, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समुहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील 120 खाटांचे आयसीयू अशा 3 हजार 520 बेड्सच्य सर्व सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री. ठाकरे बोलत होते.
मुंबईेचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशी मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयु सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने देशासमोर ठेवली आहे. ह्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरुपी रुग्णालयां इतकीच भक्कमपणे झाली आहे. यासर्व सोयी अवाक करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना बरोबरच युद्ध आपण नक्कीच जिंकू मात्र भविष्यातही अशाप्रकारे सांसर्गिक आजारांवर उपचारासाठी कायमस्वरुपी सोय होण्याच्या दृष्टीने मुंबई आणि परीसरात रुग्णालय उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
रोबोटेक तंत्रज्ञान वापरणार
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना उपचारासाठी जंबो सुविधांचा आदर्श महाराष्ट्राने देशापुढे उभा केला आहे. त्यामध्ये देशातील पहिले राज्य जेथे ६० टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, आयसीयू खाटा आहेत. या सोयी सुविधांमध्ये रोबोटेक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णांच्या उपचारासोबत डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. या जंबो उपचार सुविधांच्या माध्यमातून लोकांना जीवनदान देतानाच जगाला दिशा देण्याचं कामही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांच्या उपचार सुविधांची निर्मिती करताना महाराष्ट्राने देशासमोर आदर्श उभा केला आहे. ज्याप्रकारे उपाययोजना हाती घेतल्या आहेत ते पाहता कोरोनावर विजय मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, मुलुंड, बीकेसी येथील कोरोना रुग्णालयातील आयसीयु सुविधा कार्यान्वित झाली असून उद्यापासून तेथे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. याठिकाणच्या आयसीयु विभागात रुग्णांवर उपचार, देखभालीसाठी खासगी विशेषज्ञ, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सेवा घेण्यात घेण्यात येणार आहे, हा देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.
मुलुंड येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या १६५० खाटांच्या कोरोना रुग्णालयात १००० खाटा ऑक्सिजन सोयींयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी आहेत. याठिकाणच्या ५०० खाटा ठाणे महापालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दहिसर येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने ९५५ खाटांचे रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी १०८ खाटांचे आयसीयु उभारण्यात आले आहे. या रुग्णालयातील २०० खाटा मीरा-भाईंदर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नमुन समुहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांची क्षमता असलेले कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
अजय जाधव..७.७.२०२०
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.