या दोन शहरांत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग, पेट्रोलचा दर १२२ रुपयांवर

देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ सुरुच आहे. आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल, डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ झाली. तर मुंबईत पेट्रोल ८४ पैसे आणि डिझेल ८५ पैसे महागले आहे. यासोबतच गेल्या आठवडाभरात पेट्रोल ९.२० रुपयांनी वाढले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात परभणी येथे पेट्रोल १२२.६३ रुपये प्रती लिटर आहे. तर डिझेल १०५.२१ रुपये प्रती लिटर आहे. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल येथे विक्री केले जात आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे पेट्रोल १२२.०५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १०४.५३ रुपये प्रती लिटर आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे डिझेल सर्वाधिक महागले आहे. ते १०६.८४ रुपये दराने विक्री केले जात आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याला मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. हा डेपो परभणीपासून ३४० किमी दूर आहे. परभणी पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भडसुरकर यांनी सांगितले की, आम्ही औरंगाबाद डेपोतून इंधन मागितले आहे. तर दरात २ रुपयांची घट होऊ शकेल. जर इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणले तर लोकांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०४.६१ रुपये आणि डिझेल ९५.८७ रुपये प्रती लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल ११९.६७ रुपये आणि डिझेल १०३.९२ रुपये दराने विक्री केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here