आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ बदल दिसून येत आहे. त्याचा परिणाम इंधनाच्या किमतीवर फारसा दिसून आलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर डब्ल्यूटीआय क्रूड ०.२५ डॉलरने घसरून ८२.९४ डॉलर प्रती बॅरलवर आला. तर ब्रेंट क्रूड ०.३० डॉलरने घसरून ८६.५१ डॉलर प्रती बॅरलवर आला आहे. देशातील इंधन वितरण कंपन्यांनी १४ ऑगस्ट रोजी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थानमध्ये किमतीत किरकोळ बदल दिसून आले आहेत.
मनीकंट्रोल वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात पेट्रोल ४० पैसे तर डिझेल ३९ पैसे स्वस्त झाले आहे. झारखंडमध्ये याच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. गुजरातमध्येही इंधन दरात २७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल १२ पैसे आणि डिझेल ११ पैसै वाढले आहे. देशातील चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये अनुक्रमे १०६.०३ रुपये आणि ९२.७६ रुपये दर आहे. तर चेन्नईत पेट्रोल, डिझेलची ९४.३३ रुपये दराने विक्री सुरू आहे.
पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दररोज दर निश्चित केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात.