नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारच्या दरवाढीनंतर या किमती उच्चांकी स्तरावर पोहोचल्या. राजस्थान, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातही पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या दरात २६ रुपये प्रती लीटर तर डिझेलच्या दरात ३३ पैसे प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी १८ दिवस दरवाढ केली नाही. ४ मेपासून पुन्हा दरवाढीस सुरुवात झाली आहे. तेव्हापासून पाचव्यांदा दरवाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दिल्लीत आता पेट्रोल ९१.५३ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८२.०६ रुपये प्रती लिटर मिळत आहे.
महाराष्ट्रातील परभणीत सोमवारी पेट्रोलचा दर १००.२० रुपये प्रती लिटर होता. यापूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. व्हॅट आणि माल वाहतूक यांसारख्या स्थानिक करांच्या आधारावर इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. गेल्या एका आठवड्यात झालेल्या पाचव्या दरवाढीनंतर पेट्रोल एकूण १.१४ रुपये प्रती लिटर तर डिझेल १.३३ रुपये प्रती लिटरने वाढले आहे.