महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपने आणि सहयोगी तेल निर्यातदार देशांनी उत्पादन हळूहळू वाढविण्यावर सहमती दर्शवली आहे.
ओपेक मे महिन्यापासून जुलैपर्यंत २० लाख बॅरल प्रतिदिन तेल उत्पादन करणार आहेत. कोविड १९ महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत बदलांसाठी पावले उचलली जात आहेत. उत्पादन वाढविल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी आल्या तर देशातील पेट्रोल, डिझेलचे दर आणखी घटतील.
कोरोना महामारीच्या काळात मागणी घटल्याने किमतीमधील घसरण थांबविण्यासाठी ओपेक आणि सहयोगी देशांनी गेल्यावर्षी उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला होता. आता संघटनांनी मे ते जुलै यांदरम्यान दररोज २० लाख बॅरल तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कधी आणि किती उत्पादन वाढणार
संघटनेने मे महिन्यात ३.५ लाख बॅरल प्रतिदिन, ३.५ लाख बॅरल प्रतिदिन जून महिन्यात आणि ४ लाख बॅरल जुलै महिन्यात तेल उत्पादन वाढविण्यात येईल. यांदरम्यान, सौदी अरेबीयाने सांगितले की, त्यांच्याकडून १० लाख बॅरल प्रतिदिन जादा उत्पादन वाढविण्यात येईल.
गेल्या महिन्यात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओपेक देशांना कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते. तेल दरात स्थिरता आणण्याची मागणी केली होती. मात्र, तेल निर्यातदार देशांनी पेट्रोलियम मंत्र्यांच्या मागणीची दखल घेतली नव्हती. गेल्यावर्षी जेव्हा कच्च्या तेलाचे दर खूप कमी झाले होते, त्यावेळी खरेदी केलेल्या तेलाचा वापर भारत करू शकतो असे सौदी अरेबियाने म्हटले होते.
गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलच्या दरात २४ मार्च रोजी घट झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलमध्ये अनुक्रमे १८ पैसै आणि १७ पैसे प्रती लिटरची कपात केली होती. त्यानंतर २५ मार्च रोजी पुन्हा दरात २१ पैसे प्रति लिटर, डिझेलमध्ये २२ पैसे प्रति लिटर कपात करण्यात आली होती. २९ मार्च रोजीही पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे २२ आणि २३ पैसे प्रती लिटरने स्वस्त झाले होते.