नवी दिल्ली : इंधन दरात सातत्याने वाढ पहायला मिळत आहे. बुधवारी पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे तर डिझेलमध्ये १३ पैशांची वाढ केली. गेल्या ४४ दिवसांत इंधन दर २५ वेळा वाढले आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल १०० रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. राजस्थानाताली श्रीगंगानगरमध्ये बुधवारी पेट्रोल १०७.७९ रुपये प्रती लिटर तर डिझेल १००.५१ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.
पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालांनंतर तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. ४ मे पासून आतापर्यंत पेट्रोल ६.२६ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ६.६८ रुपये प्रती लिटरने महागले. देशाच्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ९६.६६ रुपये आणि डिझेल ८७.४१ रुपये लिटर दराने मिळत आहे.
देशातील पाच बड्या महानगरांपैकी एक असलेल्या बेंगळुरुमध्ये पेट्रोल १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आजच्या दरवाढीनंतर बेंगळुरुमध्ये पेट्रोल ९९.८९ रुपये प्रती लिटर झाले. तर मुंबईत पेट्रोल १०२.८२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९९.८४ रुपये प्रती लिटर झाले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, लड्डाख, तेलंगणा येथे पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि सरकारकडून वसुल केला जाणारा कर यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी क्रूड ऑईल ७४.७१ रुपये प्रती बॅरलवर पोहोचले. मंगळवारच्या तुलनेत यात ०.९७ टक्क्यांची वाढ झाली. तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीवेळी पेट्रोल, डिझेलच्या किमती ६६ दिवस वाढविण्यात आल्या नाहीत. परिणामी तेल कंपन्यांना प्रचंड नुकसान झाले. इंधनाच्या दरात कपात होण्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिला नाही. कोरोना महामारीमुळे खर्च वाढला असून राज्य, केंद्र सरकारांना पैशांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link