नवी दिल्ली : देशात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात आज, पुन्हा वाढ झाली. पेट्रोल-डिझेलच्या दरात १९ पैशांची वाढ झाली आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९५.५६ रुपये झाले आहे. आजवरची ही सर्वाधिक किंमत आहे. तर डिझेल ८६.४७ रुपये प्रती लिटर झाले आहे. यावर्षी ४ मे नंतर २२ वेळा पेट्रोल, डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये पेट्रोल ऐतिहासिक उच्चांकावर आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लडाखसह सहा राज्ये, केंद्रशासीत प्रदेशांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरच्या पुढे आहे. मुंबईत आता १०१ रुपये लिटर दराने पेट्रोल उपलब्ध आहे.
देशात राजस्थानमध्ये इंधनावर सर्वाधिक वॅट आकारणी होते. त्यांतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा क्रमांक लागतो. मुंबईत २९ मे रोजी पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरवर पोहोचले. मुंबईत आता १०१.७१ रुपये आणि डिझेल ९३.७७ रुपये प्रती लिटर दराने उपलब्ध आहे.
चार मे नंतर तब्बल २२ वेळा दरवाढ झाली आहे. या काळात पेट्रोल ५.१५ रुपये आणि डिझेल ५.७४ रुपये वाढले आहे. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात १५ दिवसांच्या सरासरी दरावर दररोज देशांतर्गत दरनिश्चिती करतात.