मनिला : देशात आयात केल्या जाणाऱ्या कृत्रिम स्वीटनर्सवर (artificial sweeteners) अधिक नियंत्रण ठेवण्याची मागणी फिलीपाइन्सच्या साखर उद्योगाने केली आहे. बाजारपेठेत स्थानिक पातळीवर उत्पादित साखरेवर त्याचा परिणाम होवू नये असा उद्देश यामागे आहे. याबाबत फिलिपाइन्स शुगर कौन्सिल आणि नॅशनल काँग्रेस ऑफ शुगर इंडस्ट्री युनियन ऑफ फिलिपाइन्स यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेय उत्पादनात वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे सुक्रालोज, एस्पार्टम आणि एसेसल्फेम पोटॅशियम या साखरेच्या पर्यायांनी देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात साखरेचे विस्थापन केले आहे. फिलिपाइन्स सांख्यिकी प्राधिकरणाचा हवाला देत संघटनांनी सांगितले की, गेल्या वर्षी कृत्रिम स्वीटनरची आयात १.१ दशलक्ष किलोग्रॅमपर्यंत पोहोचली आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित साखरेच्या वापरावर कृत्रिम स्वीटनर्सच्या प्रभावाची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
याबाबत शुगर कौन्सिल आणि नॅशनल काँग्रेस ऑफ शुगर इंडस्ट्री युनियन ऑफ फिलीपाइन्सने म्हटले आहे की, यामुळे विशेषत: वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर उत्पादित साखरेची बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता कमी होईल. अनियंत्रित आयातीमुळे शेती, कारखाने आणि जैवइंधन उद्योगातील कामगार विस्थापित होण्याचा धोका आहे. यापूर्वी, फिलीपाइन्सच्या युनायटेड शुगर प्रोड्युसर्स फेडरेशनने उसाच्या साखरेशी स्पर्धा करणाऱ्या इतर गोड पदार्थांवरील नियंत्रण वाढवण्याची मागणी केली होती. कृषी सचिव फ्रान्सिस्को पी. टिऊ लॉरेल, ज्युनियर यांनी साखर उद्योगाशी बैठक घेतल्यानंतर याच्या चौकशीचे आदेश दिले. लॉरेल यांनी शुगर नियामक प्रशासनाला इतर स्वीटनर्सच्या वास्तविक प्रमाणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक असल्यास, त्यांनादेखील मान्यता घेणे आवश्यक राहील असे त्यांनी स्पष्ट केले.