मनीला : फिलीपाइन्सच्या काही कारखान्यांनी साखरेच्या देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीपेक्षा एक महिना आधी हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. Asociacion de Agricultores de La Carlota y Pontevedra (AALCPI) चे महाव्यवस्थापक डेविड अल्बा यांनी सांगितले की, नेग्रोस ऑक्सिडेंटलमध्ये तीन साखर कारखाने अधिकृत गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपले कामकाज सुरू करणार आहेत.
अल्बा यांनी सांगितले की, विक्टोरियास मिलिंग कंपनी (वीएमसी), युनिव्हर्सल रोबिना कॉर्प (युआरसी) ला कार्लोटा आणि बिनलबागान इसाबेला शुगर कंपनी (बिस्कॉम) लवकरच सुरू होईल. त्यांनी सांगितले की, साखरेचा पुरवठा सातत्याने घसरत असून यादरम्यान नेग्रोस ऑक्सिडेंटल व्हाईस गव्हर्नर जेफरी फेरर यांनी कारखाने लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे काही साखर कारखान्यांचे गाळप लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेहमी सप्टेंबर महिन्यात गळीत हंगाम अधिकृतरित्या सुरू केला जातो. मात्र, आता काही कारखाने एक महिना आधी, ऑगस्ट महिन्यात गाळप हंगाम सुरू करतील. साखर नियामक प्रशासनाने (एसआरए) अलिकडेच स्पष्ट केले होते की, देशातील कच्च्या साखरेचा साठा ऑगस्टपर्यंत समाप्त होईल. कारण ऊसाचे कमी उत्पादन आणि आयात करण्यास होणारा उशीर यामुळे साखरेची मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक झाली आहे. कृषी विभाग (DA) आणि SRA द्वारे करण्यात आलेल्या गणनेनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशातील प्रक्रिया केलेली साखर समाप्त होईल असे स्पष्ट झाले आहे.