बॅकॉलोड सिटी : युनायटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशन ऑफ फिलिपाईन्सने (UNIFED) गुरुवारी राष्ट्रपती फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांच्याकडे ६४,०५० मेट्रिक टन रिफाइंड साखरेच्या आयातीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सध्या कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.
UNIFEDचे अध्यक्ष मॅन्युअल लामाता यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस ज्युनिअर यांच्याकडे जोपर्यंत कारखानदारांच्या अखेरच्या हंगामानंतर साखर साठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला जात नाही, तोपर्यंत एमएव्ही (न्युनतम ॲक्सेस वॉल्युम)च्या माध्यमातून रिफाइंड साखरेची आयात रोखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सद्यस्थितीत साखर आयात करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, देशात कच्ची आणि प्रक्रिया केलेली साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लामाता यांनी स्पष्ट केले की, युनिफेड आयातीच्या विरोधात नाही. मात्र, आता असा आयातीचा निर्णय घेणे हे आमच्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी विनाशकारी ठरेल. ते म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांमध्ये साखरेच्या एक्स मिल किमतीमध्ये घसरण झाली आहे. लामाता यांनी सांगितले की, जर आयात साखर आल्यानंतर दर आणखी कमी झाले तर शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सोसावे लागणार आहे.